
पुणे, दि. २५ : “माझे पालक कचरा उचलण्याचे काम करतात. त्यांना घरकामात मी मदत करते व त्यानंतर शाळेला येते. शाळेला येण्या-जाण्यासाठी बस पास मिळाल्यामुळे आम्हाला मदत झाली आहे,” अशी भावना पूजा या विद्यार्थिनीने सोमवारी व्यक्त केली.
रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल संस्थेतर्फे श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्त्री हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या गरजू व होतकरू विद्यार्थिनींना आमदार मेधा कुलकर्णी व पोलीस उपायुक्त तुषार दोशी यांच्या हस्ते बस पासचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापिका स्वाती वाळिंबे, सेवासादनचे व्यवस्थापकीय अधिकारी चिंतामणी पटवर्धन, श्रीधर पाटणकर, कुसुम पाटील, रोटरीचे जयंत रजपूत, उदय कुलकर्णी, गिरिश देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थिनींनी रक्षाबंधनानिमित्त माळीण ग्रामस्थांसाठी तयार केलेल्या राख्या डॉ. मिलिंद भोई यांच्याकडे सुपूर्त केल्या. आमदार मेधा कुलकर्णी यांनी राखी पौर्णिमेची भेट म्हणून मुलींना मोफत विमा काढून देण्याचे आश्वासन दिले. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले.